इस्लामाबाद – पाकिस्तानचा अष्टपैलू शादाब खान याने दुखापतीमुळे पुढील महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली आहे. न्यूझीलंडमध्ये केलेल्या एमआरआय स्कॅनचा अहवाल आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
डाव्या मांडीला दुखापत झाल्याने शादाब खानला डॉक्टरांनी सहा आठवड्यांसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. नेपियर येथे तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान दुखापत झाल्याने तो पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. तसेच 3 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासही तो खेळू शकणार नाही.
दक्षिण आफ्रिकेचा संघ 26 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यत पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामने आणि तीन टी-20 सामने खेळण्यात येणार आहे. हा दौरा ऐतिहासिक ठरणार असून दक्षिण आफ्रिकेसाठी तब्बल 14 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जात आहे. यापूर्वी 2007 मध्ये पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यात आली होती.
द. आफ्रिकेचा संघ 16 जानेवारीला कराची येथे दाखल होणार असून संपूर्ण संघ क्वारंटाइन करण्यात येणार आहे. यानंतर 26 जानेवारीपासून नॅशनल स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्यात सहभागी होणार आहे.
दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना 4 फेब्रुवारीला रावळपिंडी येथे खेळला जाणार आहे. ही मालिका आयसीसी कसोटी चॅंपियनशिपचा एक भाग आहे. कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका पाकिस्तानमध्ये प्रथमच टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहेत.