पाटणा – बिहारमधून जानेवारी 2020 ते सप्टेंबर अखेर दररोज चार बलात्कार किंवा सामुहिक बलात्कार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यातील 43 पोलिस ठाण्यात एक हजार 106 गुन्हे नोंद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या हाती आलेल्या तपशिलानुसार जून महिन्यात सर्वाधिक 152 गुन्हे नोंदवले गेले. जुलै महिन्यात 149 तर ऑगस्टमध्ये 139 गुन्हे नोंदवले गेले. जानेवारीत 88, फेब्रुवारीत 105, मार्च महिन्यात 129, एप्रिलमध्ये 82 गुन्हे नोंदवले मे महिन्यात 120 तर सप्टेंबर महिन्यात 142 बलात्काराच्या घटनेची नोंद झाली.
बलात्कार किंवा सामुहिक बलात्काराच्या घटनेशिवाय सहा ते सात छेडछाडीच्या आणि विनयभंगाच्या घटनांची नोंद झाली. एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारीची बाजू वगळता बलात्काराला सामाजिक बाजू अधिक आहे. त्यामुळे सर्व जिल्हा पोलिस अधिक्षकांना तरूणांचे प्रबोधन करण्याचे आदेश दिले आहेत.
बिहारमध्ये सुमारे 1800 ऑनलाइरन तक्रारी पोलिसांकडे येतात. त्यातील 90 टक्के गुन्हे नोंदच होत नसल्याचे बिहारमधील भीषण वास्तव आहे. सामाजिक दडपणामुळे महिला गुन्हा नोंदवण्यासाठी पुढे येत नाहीत, हे वास्तव आहे. या परिस्थितीतही आम्ही गुन्हा नोंदवण्यसाठी पुढे येण्यासाठी महिलांनी पुढे यावे म्हणून समुपदेशन करत असतो, असे एका महिला पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.