न्यूयॉर्क : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय जो बायडन यांनी मिळवला. त्यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच एका हॉलीडे रिसेप्शनचे आयोजन केले होते. या वेळी बोलताना ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरुन ते २०२४ ची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. या पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन असे म्हटले. याच वाक्यामुळे ट्रम्प यांनी आता थेट २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे.
“ही चार वर्षे खूपच छान होती,” असे ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना म्हटले. या पार्टीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीमधील अनेक सदस्य उपस्थित होते. ट्रम्प यांनी याच सदस्यांना उद्देशून, “आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला आणखीन चार वर्षे सेवेसाठी मिळावेत. म्हणूनच मी तुम्हाला भेटीसाठी चार वर्षांनंतर पुन्हा येईन असंच आत्ता सांगू शकतो,” असं म्हणाले आहेत.
एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प हे २० जानेवारी २०२४ रोजी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत चर्चाही केली आहे. मागील आठवड्यामध्ये ट्रम्प यांनी आपले वकील २०२० चे निकाल बदलू शकले नाहीत तर आपण २०२४ ची निवडणूक लढू असं म्हटलं होतं. जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले असले तरी पुढील काळात प्रसारमाध्यमांमध्ये ट्रम्प यांची चलती असेल असा ट्रम्प समर्थकांचा अंदाज आहे.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सेव्हन लेटर इनसाइड नावाच्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ट्रम्प यांनी २०२४ ची निवडणूक लढवली तर ६६ टक्के रिपब्लिकन मतदार त्यांना मतदान करतील, असं दिसून आलं. मॉर्निंग-कंसल्ट-पोलिटिकोच्या सर्वेक्षणामध्ये ५४ टक्के रिपब्लिकन मतदारांनी पक्षाकडून निवडण्यात येणाऱ्या उमेदावाराच्या निवडीमध्ये ते प्राथमिक उमेदवार म्हणून ट्रम्प यांच्या बाजूने मत देतील असे म्हटले आहे. या सर्व सर्वेक्षणामधून ट्रम्प हे नक्कीच २०२४ साठी पुन्हा आपली दावेदारी सादर करतील असे स्पष्टपणे दिसत आहे.