जकार्ता – इंडोनेशियाच्या पूर्व नुसा तेंगगारा प्रांतातील ज्वालामुखीचा रविवारी उद्रेक झाला. यामुळे आकाशात चार किलोमीटरपर्यंत राख व धुराचे लोट उठले आणि 2,700 हून अधिक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला, अशी माहिती देशातील आपत्ती निवारण संस्थेने दिली आहे.
इंडोनेशियामध्ये इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक जवळजवळ 130 सक्रिय ज्वालामुखी आहेत. यापैकी बरेच ज्वालामुखी अतिशय घातक आणि भीषण आहेत. त्यांचा उद्रेक अनेक आठवडे किंवा काही महिनेदेखील सुरू राहू शकतो.
इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून सुमारे 2,600 किलोमीटर पूर्वेकडील माउंट इले लेवोटोलॉक ज्वालामुखीमुळे जवळपास राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 26 गावांमधील सुमारे 2,770 लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे, परंतु अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ज्वालामुखी जवळील भागात तप्त वाफांचे ढग, अतिउष्ण लावाचा प्रवाह, जळणाऱ्या लाव्हामुळे होणारे हिमस्खलन, आणि ज्वलनशील विषारी वायू असण्याची शक्यता आहे, असे इंडोनेशियातील ज्वालामुखीशास्त्र आणि भूगर्भीय आपत्ती निवारण केंद्राने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे.