खर्डा -जामखेड तालुक्यातील खर्डा येथील खर्डा पोलीस दूरक्षेत्रात अज्ञात इसमाने फर्निचरची तोडफोड केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.17) पहाटे एकच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे पोलीस दूरक्षेत्रच सुरक्षित नसल्याने सामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच खर्डा येथे पोलीस ठाणे सुरू करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
खर्डा पोलीस दूरक्षेत्र कार्यालयात सध्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे.
ऐन दिवाळीच्या काळात मंगळवारी पहाटे एका अज्ञात इसमाने पोलीस दूरक्षेत्राच्या इमारतीत प्रवेश करून कार्यालयातील खुर्च्या, टेबलची तोडफोड करून मोठे नुकसान केले आहे. यावेळी एकही पोलीस कर्मचारी दूरक्षेत्रात नव्हता. सकाळी फिरायला जाणाऱ्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर पोलीस कर्मचारी दूरक्षेत्र कार्यालयात आले.
खर्डा पोलीस दूरक्षेत्राअंतर्गत परिसरातील अनेक गावे, वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. या ठिकाणी सध्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक असून, त्यातील काही बंदोबस्तावर, तर काही कर्मचारी जामखेड पोलीस ठाण्यात रात्रपाळीस नेमणुकीस असतात. त्यामुळे अनेक वेळा चौकीत कर्मचाऱ्यांअभावी बंद असते. खर्डा येथे पोलीस ठाणे मंजूर आहे. मात्र मागील बऱ्याच वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे पोलीस ठाणे तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.