पवनानगर – विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेच्या उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी पवनानगर येथे व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने पवना सायन्स महाविद्यालयासाठी फर्निचरयुक्त सायन्स लॅब व संगणक लॅबचे देण्यात आली. या वेळी सायन्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले. तर इंफ्रो इंडस्ट्रिज मरकळच्या “सीएसआर’ विभागाच्या प्रमुख कल्याणी कुलकर्णी यांच्या हस्ते संगणक लॅबचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी खांडगे बोलत होते.
पवना शिक्षण संकुलाच्या वतीने पवनानगर येथे या शैक्षणिक वर्षात सायन्स व क्रॉप (ऍग्री) सायन्स शाखा नव्याने सुरू केली आहे, त्यासाठी रोटरी क्लब ऑफ निगडी यांनी सहा लाख रूपये खर्च करून फर्निचरयुक्त प्रयोगशाळा व संगणक लॅब उभारण्यात आली.
या वेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, असिस्टंट गव्हर्नर सुशील अरोरा, रोटरी निगडीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण घाणेगावकर, निगडीचे सर्विस डायरेक्टर मुकूंद मुळे, उपाध्यक्षा प्रणिता अकुलकर, अजित कोठारी, जितेंद्र देशपांडे, जगनमोहन सिंग संस्थेचे संचालक व समर्थ शाळेचे अध्यक्ष महेशभाई शहा, एकवीरा शाळेचे अध्यक्ष सोनबा गोपाळे, नूमवि मंडळाचे संचालक शंकर नारखेडे, शालेय समितीचे सदस्य सुनील (नाना) भोंगाडे, काशिनाथ निंबळे, प्राचार्य पांडुरंग ठाकर, पर्यवेक्षिका निला केसकर, डॉ. जयश्री सुरवसे उपस्थित होते.
प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य पांडुरंग ठाकर यांनी केले. सूत्रसंचालन रोशनी मराडे व भारत काळे यांनी केले. पर्यवेक्षिका निला केसकर यांनी आभार मानले.