– श्रीनिवास वारूंजीकर
सातारा – दिपावलीचा उत्सव यावर्षी दोनच दिवसांचा असल्याने आणि यामध्ये एक भाकड दिवस आल्याने रविवार दि.15 नोव्हेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कास परिसर आणि बामणोली येथे पर्यटकांची झुंबड उडाल्याचे पहायला मिळाली. वाहनांच्या रांगा, उपहारगृह यामधील गर्दी आणि विविध पर्यटन स्थळांवर छायाचित्रण करण्यात गुंग झालेले पर्यटक तसेच बामणोली येथील बोटिंगसाठी उडालेली झुंबड पाहता अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पर्यटकांनी मनस्वास्थ्य मिळवण्यासाठी कास-बामणोली परिसराची निवड केल्याचे दिसून आले.
फुलांचा हंगाम संपलेला असल्याने कास पठारावर एक प्रकारची नीरव शांतता आढळून आली. त्यामुळे याठिकाणी थांबण्यास कोणी उत्सुक नव्हते. मात्र कास तलाव येथे विशाल जलाशयाच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रण करणारी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. निळंभोर आकाश, हिरवीजर्द झाडी आणि लालबुंद मातीच्या पार्श्वभूमीवर निळ्याशार जलाशयात तरंगणाऱ्या नौका मनमोहक दिसत होत्या.
तसेच सकाळच्या सत्रात येथे उपहारगृहामध्ये अल्पोपहार यासाठीही गर्दी दिसून आली. शिवपेटेश्वर गुंफा येथेही काही पर्यटक जाताना दिसले. सर्वाधिक गर्दीचा कळस गाठला तो बामणोली येथे कोयना धरणाच्या शिवाजीसागर जलाशयात बोटिंग करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. शेम्बडी येथील नारायण महाराज मठ, त्रिवेणी संगम, ‘मिनी काश्मीर’ तापोळा या तीन ठिकाणी जाण्यासाठी बोट बुक करून नौकानयनाचा आनंद लुटताना पर्यटक दिसून आले.
त्याचबरोबर सर्वत्र करोनाविषयी काळजी घेण्यात येत असलेले दिसले. सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे भान राखत पर्यटकांनीही आनंद लुटला. सर्व हॉटेल्स आणि उपाहारगृहांमध्ये भोजनासाठी सायंकाळपर्यंत नागरिक प्रतीक्षा करताना दिसले.
पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर सह राज्याच्या विविध भागातून आलेल्या पर्यटकांनी कास बामणोली परिसर फुलून गेल्याचे पाहायला मिळाले.
बामणोली येथील एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले की, अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर सर्व हॉटेलचालक आणि बोटक्लब पर्यटकांची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याचे एक सकारात्मक चित्र रविवारच्या निमित्ताने पाहायला मिळाले.