मुंबई : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत यात काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यातच सर्वांचे लक्ष कोरोनाच्या लसीवर केंद्रित झाले आहे. कोरोनावर लस तयार करण्यासाठी जगातील वैज्ञानिक दिवसरात्र एक करत असून काही देशांची लस शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. भारतातही काही कंपन्यांची कोरोनावरील लसीची चाचणी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. त्यामुळे आता सरकारकडून लसीकरणाची तयारी सुरु करण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
देशात कोरोनाच्या लसीकरणासाठी अंगणवाड्या, शाळा, ग्रामपंचायत आणि अशाच काही ठिकाणांचा वापर करण्यात येणार आहे. दरम्यान, यासाठी योग्य ठिकाणांचा सरकारकडून शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. लसीकरणाचे काम हे युनिव्हर्सल कार्यक्रमांतर्गत असणार आहे. तसेच हे सर्व अँटी कोरोना व्हायरस इनोक्युलेशन मोहिमे अंतर्गत करण्यात येणार आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. ज्यामध्ये ज्यांना ही लस देण्यात आली त्यांना एक मेसेज येणार आणि सोबत एक क्यूआर कोड देखील देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर प्रत्येक व्यक्तीला ओळखण्यासाठी आणि ट्रक करण्यासाठी आधार कार्डसोबत जोडण्यात येणार आहे.