नवी दिल्ली – डेरा हिंसाचार, बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा गुपचूप पॅरोलवर बाहेर आला होता अशी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील बीजेपी-जेजेपी सरकारने राम रहीमला २४ ऑक्टोबर रोजी एका दिवसाचा पॅरोल दिला होता.
राम रहीम हा पॅरोलवर बाहेर आल्यानंतर राम रहीम हा २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळपर्यंत आपली आईसोबत थांबला होता. मिळलेल्या माहितीनुसार राम रहीम याला आजारी आईला भेटण्यासाठी एका दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्या गुरुग्रामच्या एका रुग्णालयात भर्ती आहेत. डेराप्रमुख राम रहिमला रोहतकमधील सुनारिया कारागृहातून गुरुग्राममधील रुग्णालयात चोख बंदोबस्तामध्ये नेण्यात आले होते.
बीजेपी-जेजेपी सरकारने राम रहीमला २४ ऑक्टोबर रोजी एका दिवसाचा पॅरोल दिला असल्यामुळे राम रहीमला देण्यात आलेल्या पॅरोलबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. केवळ मुख्यमंत्री आणि हरियाणाच्या काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती होती. भाजपच्या एका बड्या नेत्याच्या आदेशानंतर ही हालचाल झाली होती. यामुळे या पद्धतीनं एखाद्या मोठ्या गुन्ह्यातील दोषीला पॅरोल देऊन हरियाणा अधिकाऱ्यांनी भविष्यात त्याला पॅरोलवर सुटका मागण्याची सूट दिलीय.