सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा सटमटवाडी येथून तब्बल 89 जिवंत गावठी बॉम्ब, बंदुकीच्या दोन नळ्या आणि रिकामी चार काडतुसे जप्त करण्यात आली आहे. हा शस्रसाठा शिकारीच्या उद्देशाने ठेवले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अक्षर सादिक खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई बांदा पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून संयुक्तपणे करण्यात आली.या प्रकरणी संशयितावर बांदा पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथकाला त्याठिकाणी आणले होते. ज्यानंतर “शेरा’ या श्वानाने बॉम्बच्या वासाच्या सहाय्याने घराशेजारी रचण्यात आलेल्या लाकडाच्या माचाखाली ठेवण्यात आलेला गावठी बॉम्बचा साठा शोधून काढला.
पोलिसांनी तेथून हे सर्व गावठी बॉम्ब जप्त केले. तर वाळत ठेवलेले काही बॉम्ब त्यांना आढळून आले आहेत. यात तब्बल 89 गावठी बॉम्बसह राहत्या घरातून दोन बंदुकीच्या नळ्या, चार रिकामी काडतुसे आणि बंदुकीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या शेजारील गोवा राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच सीमाभागात सिंधुदुर्ग पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.