संगीता पाचंगे
मंगळागौरच्या खेळातून संस्कृतीचे दर्शन : खेळांसह, जनजागृतीचाही प्रयत्न
पिंपळे गुरव – आज आपण 21 व्या शतकात जरी पोहचलो असलो तरी आपली परंपरा जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मराठी संस्कृतीचे जतन व महिलांच्या पारंपरिक खेळांचा वसा नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम सांगवीतील शालिनी फाटक या आजीबाई वयाच्या 80 व्या वर्षी मंगळागौर या कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत आहेत. पाणी बचतीचा संदेश देत, या कार्यक्रमाला त्यांनी जनजागृतीची जोड दिली आहे.
मंगळागौरीच्या खेळाबरोबर श्रावणाचे महत्त्व मनोरंजनाच्या माध्यमातून त्या पटवून देतात. 15 जणींच्या ग्रुपमध्ये उषा एन. पुरे, विद्या धर्माधिकारी, अलका पडवळ, संगिता जायभाय, सोनाली कासरुंग, अश्विनी कासरुंग, वैजयंती जोशी, अश्विनी सुर्यवंशी आदींचा समावेश आहे.
शालिनीआजी सांगतात की, त्यांचे पती शरदचंद्र फाटक हे हवाई दलात नोकरी करत होते. त्यामुळे अनेकदा नोकरीच्या बदलीच्या ठिकाणी राहण्याची वेळ आली.
त्यामुळे जाईल तिथे आपले सण साजरे करायचे, गणेशाची प्रतिष्ठापना करायची, विविध खेळांचे आयोजन करायचे यातून महिलांचे पारंपरिक खेळ पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे विचार सातत्याने मनात सुरू असायचे. त्यातून जेथे आमचे बिऱ्हाड जाईल, तेथे मंगळागौर व महिलांचे खेळ घेण्यास सुरूवात केली. सांगवीमध्ये आल्यानंतर आमचा महिलांचा मंगळागौरचा एक ग्रुप तयार झाला. सांगवीतील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात पहिली कला सादर केली, असे शालिनी सांगतात. बहुसंख्य पारंपरिक खेळ व त्याचे लिखाण व निवेदन त्या स्वतः करतात. बाहेरगावी कार्यक्रमांना बोलावल्यास केवळ येण्या-जाण्याच्या खर्चावर आम्ही आपली कला जोपासत असल्याचे त्यांनी सांगितले.