सोलापूर – सोलापूर शहरात करोना संसर्गामुळे शहर आणि जिल्ह्यात दररोज मृतांचा आकडा वाढतो आहे. याशिवाय सोलापुरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता हा एक तिसराच गहन मुद्दा आता सतावू लागला आहे. त्यामुळे सोलापूर शहर व्हेंटिलेटरग्रस्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोलापूर शहरात रुग्णालयांमध्ये सध्या कोविड व नॉन कोविड अशा आठ हजार रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील दोन हजार रुग्ण हे करोना बाधित आहेत .
त्यातच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. असे असतानाच महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात पीएम केअर फंडातून देण्यात आलेले सर्वच्या सर्व आठ व्हेंटीलेटर मशीन धूळखात पडले आहेत. महानगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करत असल्याचा आरोप भाजप नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी केला आहे.
सोलापूर शहरातील सर्वच हॉस्पिटलवर शहर आणि ग्रामीण भागासह उस्मानाबाद, लातूर यासह कर्नाटक आणि मराठवाडा या भागातून येणाऱ्या रुग्णांचा ताण पडत आहे. सोलापूर शहरात शासकीय, मनपा व खाजगी अशी एकूण 375 हॉस्पिटल्स कार्यरत आहेत. या रुग्णालयांमधून दहा हजार रुग्णांना उपचार देण्याची सुविधा आहे .परंतु अत्याधुनिक आयसीयू ,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची सुविधा ही जनरल बेडच्या तुलनेत केवळ आठ टक्के इतकी असल्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना उपचार मिळणे अवघड बनले आहे.
महानगरपालिका, सिव्हिल हॉस्पिटल आदींमध्ये सध्या 813 ऑक्सिजन बेड ,135 व्हेंटिलेटर बेड आणि 367 आयसीयू बेड आहेत. आजमितीला मात्र यामध्ये एकही बेड शिल्लक नाही .बेड मिळविण्यासाठी कोणाचातरी डिस्चार्ज घेण्याची किंवा कोणत्यातरी रुग्णाची मरण्याची वाट पाहण्याची दुर्देवी वेळ रुग्णांवर आली आहे.