नवी दिल्ली : भारत सरकारने सुरू केलेल्या करोना लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी फायझरने कोणताही आर्थिक फायदा न कमवता लसीचा पुरवठा करण्याची ऑफर भारत सरकारला दिली आहे. त्या संबंधी भारत सरकारशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
भारत सरकारने सुरू केलेल्या व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी फायझर कंपनी ‘ना नफा’ या किमतीमध्ये लस देण्यास तयार आहे. त्या संबंधी आम्ही भारत सरकारच्या सातत्याने संपर्कात असून आमची चर्चा सुरू आहे, असे फायझर कंपनीचे प्रवक्त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकन कंपनी फायझरने स्पष्ट केले आहे की, सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासंबंधी कंपनीची काही वेगळी धोरणं असून त्याच्या आधारे ना-नफा किमतीमध्ये काही देशांना करोनाच्या लसी पुरवण्यात येणार आहेत.
विकसित, विकसनशील आणि मागासलेल्या देशांसाठी फायझरच्या करोना लसींच्या किमती वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जगभरातील करोना लसीकरणामध्ये कंपनीचा हातभार लागेल असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेत फायझरच्या लसीच्या एका डोसची किंमत ही 19.5 डॉलर इतकी आहे. तर युरोपमध्ये कंपनीने आपल्या लसीच्या किमतीत वाढ केली आहे.
सुरुवातीला 12 युरोमध्ये उपलब्ध होणारी ही लसीची किंमत नंतर 15.5 इतकी करण्यात आली आणि त्यात आता पुन्हा वाढ करून 2022-23 सालच्या ऍडव्हान्स ऑर्डर्ससाठी ती 19.5 युरो इतकी करण्यात आली आहे.