२४ तासांमध्ये ७,९६४ नव्या करोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली :   देशात करोनाचा कहर  वाढत चालला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ७,९६४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ७३ हजार ७६३ झाली आहे. २४ तासांत तब्बल २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ४९७१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे देशात आतापर्यंत ८२ हजार ३७० जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे देशात सध्या ८६ हजार ४२२ जणांवर उपचार सुरू आहेत.


जगभरातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या दहा देशांमध्ये भारत नवव्या क्रमांकाचा देश ठरला आहे. गेल्या आठवडय़ात तो दहावा होता, आता देशातील रुग्णांची संख्या तुर्कीपेक्षाही जास्त झाली आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते ४२.८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. ८२ हजार ३७० रुग्ण बरे झाले आहेत.

दिल्लीत पहिल्यांदाच एका दिवसात एक हजारहून अधिक नवे रुग्णे आढळले. शुक्रवारी दिल्लीत १,०२४ रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या आता १६,२८१ झाली आहे. मृत्यूचा आकडाही ३१६ झाला असून चोवीस तासांमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील १३ शहरांमध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. त्यातही मुंबईत सर्वात जास्त असून आता दिल्ली दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे.

शहरात रुग्णवाढीचा दर ४.८९ टक्के (प्रतिदिन वाढ) असून देशाची सरासरी ५.०२ टक्के आहे. देशाच्या तुलनेत दिल्लीत रुग्णवाढीचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर ५.४४ टक्के आहे. बिहार, आसाम, केरळ या राज्यांमध्येही देशाच्या सरासरीपेक्षा रुग्णवाढीचा दर अधिक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.