खेळाडूंच्या उत्तेजक द्रव्य सेवनावर लक्ष
मॉंट्रियल – जगभरातील खेळाडूंनी प्रामाणिकपणे खेळात सहभागी व्हावे यासाठी त्यांनी उत्तेजर द्रव्य सेवनापासून लांब राहावे यासाठी कार्यरत असलेल्या जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने (वाडा) येत्या काळात खेळाडूंवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेण्याचे निश्चित केले आहे.
सध्या जगभरात करोनाचा धोका असल्याने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास मनाई केली आहे. ज्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत, त्यांना करोनाचा धोका जिथे कमी असेल तिथे जर सुरुवात करण्यात आली तर त्याचवेळी सहभागी होत असलेल्या खेळाडूंच्या उत्तेजक सेवन चाचण्याही घ्याव्याच लागणार आहेत. मग त्यावेळी कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासणार आहे म्हणूनच त्यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल, असे मत वाडाकडून जाहीर करण्यात आले आहे.
जेव्हा करोनाचा धोका संपुष्टात येईल त्यानंतरच्या काळातही खेळाडूंच्या चाचण्या सातत्याने घ्याव्या लागणार आहेत. तसेच यापूर्वी जे खेळाडू याबाबत दोषी आढळले होते त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या रक्ताचे व युरीनचे नमुने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे डागाळलेला इतिहास असलेल्या खेळाडूंवर लक्ष ठेवावे लागेल. या परिस्थितीत मनुष्यबळ कमी पडणार त्यामुळे संगणकीय मदत तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावाच लागेल, असेही वाडाने स्पष्ट केले आहे.
मधुशंका निलंबित…
अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी श्रीलंकेचा क्रिकेटपटू शेहान मधुशंका याला श्रीलंका क्रिकेट मंडळाने निलंबित केले आहे. या प्रकरणातून सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्याला निलंबित करण्यात आल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. आता त्याच्यावर वाडाकडूनही काय कारवाई केली जाते ते दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.