पुणे – करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांसह खासगी रूग्णालयात आयसीयू बेडस् तयार करण्याची लगबग सुरू आहे. प्रादुर्भाव वाढून आवश्यकता भासल्यास ससून रुग्णालयातील नवीन इमारतीमध्ये 50 बेड्सचे आयसीयू तयार करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पुणे शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडताच पुणे महापालिकेच्या वतीने 24 तासात 200 बेडस्चे रुग्णालय उभारले. तसेच शहरातील 18 खासगी रुग्णालयात बेडस् तयार ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून पूर्वतयारी केली जात आहे. यामध्ये कोठे कोठे आयसीयू बेडस् उभारता येतील याची पाहणी केली जात आहे. प्रथमत: शासकीय रुग्णालयाची पाहणी केली असता, ससून रुग्णालयात अकरा मजली नवीन इमारत उभारण्यात आली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे आवश्यकता भासल्यास याठिकाणी 50 बेडस्चे आयसीयू उभारण्यात येणार आहे. याठिकाणी सुसज्ज जागा असल्यामुळे प्रशासनावरील भार थोडासा हलका होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.