अहमदाबादेतील भाषणामध्ये ट्रम्प यांनी भारताच्या सांस्कृतिक वारशाचा सर्व जगाला अभिमान आहे आणि भारताची प्रगती ही सर्व जगासाठी प्रेरणादायी आहे असे बोलून दाखवले आणि उपस्थितांची मनं जिंकली पण काही भारतीय शब्द उच्चारताना ते अडखळले.
भाषणावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या नावाचा उच्चार केला. स्वामी विवेकानंद हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे ते म्हणाले पण विवेकानंद यांचे नाव त्यांना व्यवस्थित घेताच आले नाही. “स्वामी विवेकामनन’ असे अडखळत त्यांनी नाव घेतले. तसेच त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी सचिन तेंडुलकरचेही नाव “सूचिन तेंडुलकर’ असे घेतले यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
भारतात 2000 हून अधिक चित्रपट दरवर्षी येतात. बॉलिवुडची जादू फक्त भारतावरच नाही तर जगावर आहे असे देखील ते म्हणाले. क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू या देशातलेच आहेत. विराट कोहली आणि सूचिन तेंडुलकर (सचिन तेंडुलकर) हे दोघे महान क्रिकेटपटू असल्याचं ते म्हणाले.