मुंबई – जिओचे 5 -जी दूरसंचार तंत्रज्ञान हे पूर्णतः भारतीय बनावटीचे असल्याचा दावा रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केला. आमची पूर्ण तयारी झाली आहे. 5-जी स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यावर लगेच ट्रायल सुरू करू, असे त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.
आम्ही केवळ 5- जी तंत्रज्ञान विकसित केलेले नाही तर वीस स्टार्ट अप्च्या सहकार्याने जागतिक दर्जाचे क्लाऊड कॉम्प्युटिंग, बिग डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात आमची कंपनी जागतिक पातळीवर आगामी काळात वाटचाल करणार आहे. आम्ही जिओमीट हे ऍप सुरू केल्यानंतर 50 लाख नागरिकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे
गुगलची 33 हजार कोटींची गुंतवणूक
दरम्यान, गुगल कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्म मधील 7.7 टक्के भागभांडवल तब्बल 33,737 कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिओ प्लॅटफॉर्ममधील 32.84 टक्के भागभांडवल कंपनीने 1,52,055 कोटी रुपयांना उपलब्ध केले आहे. आता भांडवल उभारण्याचा कार्यक्रम संपला असल्याची माहिती अंबानी यांनी दिली.