नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्याचा करोनाने बुधवारी (दि. 15) मृत्यू झाला. आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांना सोमवारी (दि. 6) लेण्याद्री येथील कोविड केंद्रातून आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान या युवकाचे फुफ्फुस निकामी झाल्याने त्याचे निधन झाले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ यांनी दिली.
दरम्यान, त्यांच्या सानिध्यात आलेल्या कुटुंबातील पाच जण करोनाबाधित रुग्ण येथील लेण्याद्री कोविड केंद्रात उपचार घेत आहेत. तो वारूळवाडी येथे एका सोसायटीत राहत होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर आदी नेत्यांनी शोक संदेश देऊन हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, वहिनी, चुलते असा परिवार आहे.