आता तेल उत्पादक राष्ट्रांवरच बाजी उलटली?
लंडन, दि. 1 – जगभर तेल टाक्या भरून वाहत असून तेल शुद्धीकरणाचे कारखाने पूर्वीपेक्षा निम्म्या वेगाने काम करीत आहेत. त्यामुळे तेल वाहक जहाजे समुद्रावर नुसतीच हिंडत आहेत. तेल निर्यात बंदी झाल्यापासून इंधन व वीज यांचा तुटवडा झाला आहे असे भय निर्माण होत असतानाच आता तेलाचे उत्पादन करणाऱ्या राष्ट्रांपुढे नवा प्रश्न उभा राहिला आहे की, या इतक्या तेलाचे आता करावे काय? आता बाजी तेल उत्पादक राष्ट्रांवर उलटली आहे. यापुढे उत्पादनात कपात वगैरे मार्ग त्यांना चोखाळणे भाग पडत आहे.
अपप्रचार थांबवा! पाकला खलिता
नवी दिल्ली – भारत आणि काश्मिरी नेते शेख अब्दुल्ला यांच्या विरूद्ध पाक रेडिओवरून होत असलेला अपप्रचार त्वरित थांबवावा अशा आशयाचा तातडीचा खलिता आज भारत सरकारने इस्लामाबादला धाडला. परराष्ट्र चिटणीस केवलसिंग यांच्या फेब्रुवारीतील खलित्यास पाकने पाठविलेले उत्तरही येथे आले आहे.
..तरच पैसे देणे हा भ्रष्टाचार म्हणावा
नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने आज निवडणूक भ्रष्टाचार प्रकरणी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्याअन्वये एखाद्या उमेदवारासाठी लोकांना पैसे देणे हा भ्रष्टाचार होऊ शकणार नाही, अर्थात पैसे देऊन मते देण्यासाठी मतदारांना उमेदवाराने प्रवृत्त केले असे सिद्ध झाले पाहिजे, तर तो भ्रष्टाचार म्हणावा लागेल. मध्यप्रदेशचे एक आमदार कल्याणसिंग यांची निवड सुप्रीम कोर्टाने वैध ठरविली आहे. मध्यप्रदेश हायकोर्टाने त्यांची निवड भ्रष्टाचार केला या कारणावरून रद्द ठरविली होती.
पुन्हा शस्त्रबंदी करा
नवी दिल्ली – पाकिस्तानबाबत शस्त्रबंदी पुन्हा लागू करावी असा ठराव तीन अमेरिकन सिनेटर्सनी सिनेटमध्ये मांडला आहे. फ्रॅक चर्च, अर्नेस्ट हॉलिंग्ज, अलन क्रॅनस्टन यांनी मांडलेल्या या ठरावात म्हटले आहे की, शस्त्रबंदी उठविणाच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे उपखंडातील वातावरण सुधारण्याच्या प्रकियेत अडथळा निर्माण झाला आहे.