नवी दिल्ली – मतपत्रिकेतील जोड चिठ्ठीवर मतदाराचा अंगठा उठवण्याची किंवा सही घेण्याची पद्धत यापुढे बंद करण्यात येणार आहे. निवडणूक सुधारणा प्रश्नांवर पंतप्रधानांबरोबर विरोधी पक्षांनी ज्या वाटाघाटी केल्या त्यात वरील पद्धत बंद करण्याचे ठरले होते. त्यानुसार केंद्रीय कायदा खात्याने 1961च्या निवडणूक कायद्यात वरीलप्रमाणे दुरुस्ती केली आहे. वरील दुरुस्तीनुसार येत्या गुजराथ असेंब्ली निवडणुकीचे वेळी ही पद्धत रद्द करण्यात येणार आहे. 8 व 10 जून रोजी या निवडणुका होतील. गुजरातमधील पक्षांना यावेळी निवडणूक याद्यांच्या 3 प्रति पुरविण्यात येतील.
“गाय वासरू’ निवडणुकीत धार्मिक चिन्ह?
अलाहाबाद – “गाय वासरू’ हे कॉंग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह “धार्मिक चिन्ह’ आहे, असा निर्णय जर अलाहाबाद हायकोर्टाने दिला तर येत्या गुजराथ असेंब्लीच्या निवडणुकीत गोंधळ माजेल व त्या निवडणुकी “बेकायदेशीर’ ठरवाव्या लागतील, असे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले.
सिक्कीमच्या बिलावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब
नवी दिल्ली – राष्ट्रपती फकरूद्दीन अहमद यांनी सिक्कीम हे भारताचे 22 वे राज्य झाले अशा अर्थाच्या घटना दुरुस्ती बिलास मान्यता दिली. सिक्कीम हे 22 वे राज्य झाल्यानंतर बी. बी. लाल यांना सिक्कीमचे पहिले राज्यपाल म्हणून नेमण्यात आले आहे.