निवृत्तीच्या निर्णयापासून परावृत्त करू नका
पुणे, दि. 11 – “मी आता 60व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेली 40 वर्षे मी राजकारण व समाजकारण करीत आलो आहे. त्यापैकी आजपासून राजकारण सोडले म्हणून एमएलसीचा राजीनामा दिला आहे’, असे वसंतदादा पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले, माझे पूर्वीपासून असे मत आहे की, साठी गाठलेल्या राजकारणी माणसांनी (अति महत्त्वाच्या माणसाशिवाय) समाजसेवेची विधायक कामे अंगावर घ्यावीत व तरुणांना राजकीय क्षेत्रे मोकळी करून द्यावीत. या विचारांच्या संदर्भात मी हा विचारपूर्वक निकाल घेतलेला आहे. माझ्या या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू नये.
राज्यातील आमदारांना निवृत्तीवेतन मिळणार
मुंबई – आमदारांना निवृत्तीवेतन देण्यात यावे, असा निर्णय आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला. तसे विधेयक नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात मांडण्याचेही ठरले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना हा निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण म्हणाले, “जे भाग सध्या महाराष्ट्रात येतात, त्यातून निवडून येऊन ज्यांनी 1952 पासून 5 वर्षे वा अधिक काळ विधिमंडळ सदस्य म्हणून काम केले असेल, त्यांना दरमहा किमान 250 रुपये निवृत्तीवेतन दिले जाईल. 5 वर्षांहून अधिक सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी 50 रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त दरमहा 500 रुपयांपर्यंत ते देण्यात येईल.