मूठभर धनवान राष्ट्रांच्या मक्तेदारीविरुद्ध लढा
लूसाका, दि. 16 – जागतिक आर्थिक क्षेत्रातील अल्पसंख्याकांच्या मक्तेदारीविरुद्ध गरीब राष्ट्रांना लढा देणे भागच आहे. आमचे श्रीमंत राष्ट्रांशी भांडण नाही. परंतु बड्यांच्या दडपणाला बळी पडावे लागू नये. आणि त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रात सहकार्य वाढावे यासाठी आम्हाला आमचे आर्थिक सामर्थ्य वाढविलेच पाहिजे, असे उद्गार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आज येथे काढले.
वस्तुतः ही श्रीमंत राष्ट्रे आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षा अधिक रक्कमसुद्धा मदत म्हणून खर्च करीत नाहीत. पण आम्ही मात्र आमच्या दैन्यावस्थेतच समाधान मानावे अशी अपेक्षा केली जाते.
चिनी सत्तावर्तुळात पुन्हा प्रवेशाचा तेंग यांचा प्रयत्न
टोकियो – चिनी सत्ता मंडळातून दोनवेळा अर्धचंद्र मिळालेले माजी उपपंतप्रधान तेंग सियाओ-पिंग हे पुन्हा सत्तेवर येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जपानी वृत्तपत्रांनी म्हटले आहे. सध्या चीनमध्ये चालू असलेल्या सत्ता संघर्षात तेंग हे पंतप्रधान व नियोजित पक्षाध्यक्ष हुआ कुवा फेंग यांना पाठिंबा देत असल्याचे या आधीच प्रसिद्ध झाले आहे.
त्याचवेळी तेंग यांचा “तरुण कम्युनिस्ट नेता’ असा गौरव करणारा वृत्तपट दूरचित्रवाणीवर पुन्हा दाखविला जात आहे, चिनी सांस्कृतिक क्रांतीच्या काळात माजी पंतप्रधान चौ एन लाय यांच्या पाठोपाठ तेंग यांच्यासंबंधी चित्रपट दाखविला जात आहे.