राजगुरूनगर-खेड तालुक्यात 24 तासांत नव्याने 43 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 1771 तर मृतांची संख्या 45 वर पोहोचली आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
नाणेकरवाडी गावातील 95 व 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यावरील करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असताना आता नागरिक सतर्कता बाळगत नसल्याचे समोर आले आहे. शासनाच्या नियमांची पायमल्ली करीत नागरिक खुलेआम रस्त्यावर, दुकानात गर्दी करत असल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.
चाकण परिसरात संख्या झपाट्याने वाढत असल्याने येथे प्रभावी उपाययोजना करणे नित्याचे झाले आहे. एमआयडीसीमधील कामगारांमध्ये करोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने तो तालुकाभर पसरत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत.
खेड तालुक्यात मागील 24 तासात चाकण (7), आळंदी (6), राजगुरूनगर (3) अशा तीन नगरपरिषदांमिळून 16 तर तालुक्यातील ग्रामीण भागातील कोयाळी (1), चिंचोशी (1), शेलपिंपळ्गाव (3), सोळू (8), शेलगाव (5), बहुळ (1), भोसे (1), वाकी बुद्रुक (1), मोई (1), मेदनकरवाडी (5) या 10 गावात एकूण 27 जणांना करोनाची लागण झाली आहे.