महाविद्यालय आणि प्राध्यापकांवर कारवाईची तलवार
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे अंतर्गत गुणांत त्रुटी आढळल्यास महाविद्यालय आणि संबंधित प्राध्यापकांना संयुक्तपणे प्रति विद्यार्थी 1 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला आहे. तसेच 3 पेक्षा जास्त वेळेस अंतर्गत गुणांसंदर्भात त्रुटी आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार आहे. त्यामुळे आता शिक्षक व महाविद्यालयांना योग्य पद्धतीने अंतर्गत गुण भरणे आवश्यक बनले आहे. यासंबंधीचे परिपत्रक पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी प्रसिद्ध केले.
परीक्षा झाल्यानंतर संलग्नित महाविद्यालये त्यांच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण अंतिम निकालासाठी विद्यापीठाकडे पाठवतात. त्यानंतर अंतर्गत व लेखी गुणांच्या आधारे निकाल जाहीर केला जातो. परंतु काही विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण देताना प्राध्यापक किंवा महाविद्यालये चुका करतात. त्या होऊ नये व त्याचा परिणाम निकालावर होतो. त्या पार्श्वभूमीवर अंतर्गत गुणांत चुका करणाऱ्या महाविद्यालयांवर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2018 च्या सत्रापासून कारवाई केली जात होती. याअंतर्गत विविध अनुदान योजना, गुणवत्ता सुधार योजना, दहा टक्के वाढीव जागा, विविध प्रकारचे पुरस्कार आदीपासून महाविद्यालयांना दोन वर्षे कालावधीसाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यात सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने याबाबत स्वीकारलेल्या अहवालानुसार परीक्षा व मूल्यापामन मंडळाकडून सुधारित नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार विद्यापीठाने दिलेल्या कालावधीमध्ये विषय शिक्षकांनी अंतर्गत गुण हे ऑनलाइन पद्धतीनेच भरून ते बरोबर असल्याची खातरजमा झाल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून त्यावर स्वाक्षरी करायची आहे. तसेच स्वाक्षरी करताना संबंधित प्राध्यापकांनी “वरील सर्व मार्कस् मी पूर्णपणे वाचले असून ते बरोबर असल्याची खात्री केलेली आहे’, असे हमीपत्र देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सदर हमीपत्रावर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी गरजेची आहे.
विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण योग्य पद्धतीने भरण्याची संपूर्ण जबाबदारी संयुक्तपणे विषय प्राध्यापक व महाविद्यालयांची आहे. त्यात त्रुटी निदर्शनास आल्यास दंड आकारला जाणार आहे. ही बाब महाविद्यालयाने सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी.
– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ