सिमला – हिमाचल प्रदेशात दरडीखाली आणखी 4 मृतदेह ;
मृतांची संख्या 14 वर – हिमाचल प्रदेशातल्या किन्नूर जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आणखीन 4 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 14 झाली आहे.
“एनडीआरएफ’, “आयटीबीपी’, पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी आज सकाळी पुन्हा मदत कार्याला सुरूवात केली. तेंव्हा हे चार मृतदेह सापडले, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोखता यांनी सांगितले.
हिमाचल प्रदेश परिवहन महामंडळाच्या बसबरोबरच अन्य काही वाहनांवर दरड कोसळल्याने ही वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. दरडीखाली या वाहनांचे मोठे नुकसान झाले असल्याचे आढळून आले आहे. मात्र ढिगाऱ्याखाली गाडली गेलेल्या एका बोलेरो कारचा कोणताही ठावठिकाणा लागू शकलेला नाही.
आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमी झालेल्या 13 जणांना भावनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखीन काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मात्र किती जण गाडले गेले असावेत याचा अंदाज नाही.”एचआरटीसी’ची बस रेकोंग पाओ येथून सिमला मार्गे हरिद्वारला जात असताना चौरा गावाजवळ ही दुर्घटना घडली.
मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी आज घटनास्थळाला भेट दिली आणि मदत व बचाव कार्याची पहाणी केली. भावनगर येथील रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींचीही विचारपूस केली.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर उपचार देखील सरकारच्यावतीने केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. बस मधील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना परिवहन विभागाच्यावतीने अतिरिक्त 1 लाख रुपये दिले जाणार आहेत.