मेलबर्न, (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतातील फिलीप बेटावर समुद्रकिनाऱ्याजवळ ४ भारतीय बुडाले आहेत. या चौघांमध्ये २ महिलाही आहेत. बुधवारी घडलेली ही या बेटावरची गेल्या २० वर्षातील सर्वात भीषण दुर्घटना असल्याचे मानले जाते आहे.
नौव्हावेन येथे समुद्रामध्ये चौघेजण बुडत असल्याचे समजल्यावर आपत्कालिन दलांनी मदतीसाठी धावाधाव केली.
चौघांना पाण्याबाहेर काढल्यावर त्यांची काहीही हालचाल आढळली नाही. यापैकी तिघांना किनाऱ्यावरील नागरिकांनी पाण्याबाहेर काढले. तर एकाला बचाव बोटीने बाहेर काढले. वाचवण्याचा खूप प्रयत्न केल्यानंतरही चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला होता, असे बचाव कर्मचाऱ्यांनी सांगितले. चौथ्या महिलेचा नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या चारही जणांची नावे उघड केली गेलेली नाहीत. कॅनबेरामधील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर या दुर्घटनेची माहिती दिली. या मृतांमध्ये २० वर्षांचे २ युवक आणि एक महिला आहे. तर ४० वर्षांच्या एका अन्य महिलेचाही समावेश आहे. ही महिला सुटी घालवण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आली होती. तर अन्य तिघे मेलबर्नमध्ये राहणारे होते, असे पोलिसांनी म्हटले आहे. फिलीप बेटावरील फॉरेस्ट केव्हज भागात ही दुर्घटना घडली. या समुद्रकिनाऱ्याजवळ कोणीही जीवरक्षक तैनात नव्हते. मात्र तेथून काही किलोमीटरवरील किनाऱ्यावर जीवरक्षक तैनात होते.