डॉ. नायडू आणि ससूनसह खासगी रुग्णालयांत उपचार सुरू
पुणे – शहराला करोनाचा विळखा झपाट्याने वाढत असून, दररोज दुपटीने करोना बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत करोनाचे आणखी 35 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये डॉ. नायडू आणि ससूनसह खासगी रुग्णालयात या बाधितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे आणि ग्रामीण भागात मिळून 119 पर्यंत करोनाच्या रुग्णांची संख्या गेली आहे. तबलिगीवरून आलेले प्रवासी आणि लॉकडाउनमध्ये जिल्हा प्रशासन व पोलीस यांच्या सूचनांचे गांभीर्याने पालन न केल्यामुळे मागील आठ दिवसांपासून शहरातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मात्र, ही भीती दूर करायची असेल, वेळेत या करोनाला रोखायचे असेल तर अजूनही पुणेकरांकडे दहा दिवस आहेत. या दहा दिवसांत नागरिकांनी घराबाहेर पडले नाही. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले
नाहीत.
स्वतःला घरात विलागीकरण करून घेतले तर प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. तसेच ज्यावेळी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी चढत्या नव्हे, तर उतरताक्रम सुरू झाला तरच ही लढाई आपण जिंकू शकेल. गेल्या 24 तासांत दाखल झालेल्या बाधितांपैकी 27 रुग्णांवर नायडू, खासगी-1 तर ससून रुग्णालयात 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये 5 जणांची प्रकृती चिंताजनक असून, नायडूमधील 1 आणि खाजगी रुग्णालयातील 3 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत करोनाने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 1 हजार 423 व्यक्तींची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1 हजार 296 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 107 जणांवर विलागीकरण कक्षात उपचार सुरू असून, 81 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.