नवी दिल्ली – करोनाच्या विरोधातील लढाईत चाचणीचे किटस् आणि संरक्षक वेश यांची आवश्यकता जगभरातील सर्व देशांत व्यक्त होत असतानाच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) याबाबत सकारात्मक बातमी दिली आहे. वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कोरोनापासून सुरक्षित ठेवणारा बायो सुट विकसित केला आहे.
भारतीय संरक्षण मंत्रालयाने याबाबत निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. नॅनोटोक्नॉलॉजॅतील त्यांच्या कौशल्यासह त्यांच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या अथक परिश्रमाच्या सहाय्याने डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी हे यश मिळवले आहे. त्यातूनच व्यक्तीगत सुरक्षा साधने विकसित केली आहे. या विषाणूंचे स्वरूप लक्षात घेऊन आखलेल्या टेक्स्टाईल निकषांच्या चाचण्या विविध चाचण्या घेऊन हा सुट विकसित केला आहे. हा वेश परिधान केलेली व्यक्ती कृत्रीम रक्तापासून स्वत:चा बचाव करू शकली.
केंद्रीय कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाच्या बॉडी सुटसाठी असणाऱ्या निकषांपेक्षा अधिकचा निकष म्हणून कृत्रिम रक्ताची चाचणी घेण्यात आली. या सुटच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी सर्व आवश्यक ती पावलेडीआरडीओने उचलली आहेत. या सुटच्या निर्मितीवर डीआरडीओचे भागीदार असणाऱ्या दोन खासगी कंपन्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
या सुटचे उत्पादन त्याच्या शिलाईसाठी लागणाऱ्या विशिष्ट धाग्यांमुळे थांबले होते. मात्र त्याला पर्याय शोधण्यात आला आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसीन अँड अलाईड सायन्सने रेडिऑलॉजिकल इमर्जन्सी हाताळाव्या लागणाऱ्या कर्मचाऱ्यासांठी पुन्हा वापरता येणारा सूट विकसित केला आहे. तर भारतीय नौदलाने जारी केलेल्या स्वतंत्र निवेदनात इन्फ्रारेड आधारित टेम्परेचर सेन्सर नौदलाच्या डॉकयार्डने विकसित केले अहे. त्यांच्याकडील साधनांत त्याची निर्मिती हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या 20 हजार कर्मचाऱ्यांची व्यक्तीगत स्पर्श न करता तपासणी करणे शक्य होणार आहे.