मॉस्को – रशियाच्या दक्षिणेकडील देगस्तान प्रांतात एका गॅस स्टेशनवर झालेल्या भीषण स्फोटामध्ये किमान 35 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. रशियातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. या स्फोटात आणि त्यानंतर लागलेल्या आगीमध्ये किमान 115 जखमी झाले आणि त्यापैकी 35 जणांचा मृत्यू झाल्याचे रशियातील आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जखमी झालेल्या 65 जणांमध्ये 16 लहान मुलांचा समावेश आहे. जखमींपैकी 2 मुलांसह एकूण 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रांताची राजधानी मखाचकालाच्या जवळच असलेल्या या गॅस स्टेशनवर सोमवारी रात्री हा स्फोट झाला. कार दुरुस्तीच्या दुकानामध्ये पहिल्यांदा ही आग लागली आणि त्यानंतर झपाट्याने जवळपासच्या दुकानांमध्ये ही आग पसरली. त्यामुळे गॅस स्टेशनमध्ये भीषण स्फोट झाला.
या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईककांना एक दशलक्ष रुबल (10 हजार डॉलर) आणि जखमींना 2 लाख ते 4 लाख रुबल (2 ते 4 हजार डॉलर) पर्यंतची नुकसान भरपाई मिळेल, असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. या दुर्घटनेच्या कारणांचा गुन्हेगारी दृष्टिकोनातून तपास करण्यात येत आहे. पश्चिम सायबेरियामध्ये देखील एका तेल खाणीत झालेल्या स्फोटात दोघे जण ठार झाले आणि अन्य पाच जण जखमी झाले आहेत.