थिरूवनंतपूरम -केरळमध्ये शुक्रवारी संशयास्पद स्फोटात एकाचा मृत्यू झाला. त्या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला. ऐन निवडणूक काळात स्फोटाची घटना घडल्याने राजकारण तापले आहे.
कन्नूर जिल्ह्यात स्फोटाची घटना घडली. त्यावरून कॉंग्रेस आणि भाजपने केरळमधील सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या माकपवर टीकास्त्र सोडले. माकपचे समर्थक गावठी बॉम्ब बनवत असताना स्फोट झाल्याचा आरोप कॉंग्रेसने केला.
तर, बॉम्बचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा माकपचा प्रयत्न असल्याचे भाजपने म्हटले. मात्र, माकपने स्फोटाच्या घटनेशी कुठला संबंध असल्याचा इन्कार केला आहे.
स्फोटाच्या घटनेने केरळमधील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे चित्र आहे. त्या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना बळ मिळण्याची चिन्हे आहेत.