नगर – जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक नगरपालिका हद्दीत सीसीटिव्ही यंत्रणेची सुविधा उभारणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, अत्याधुनिक यंत्रणा शहरामध्ये कार्यान्वित करण्याची शहरवासियांची मागणी होती. ती आज या निमित्ताने पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील 51 चौकांमध्ये 204 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखी 200 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे शहरांतर्गत व शहराबाहेर होणाऱ्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास मदत होऊन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाला यामुळे आळा घालता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या यंत्रणेबरोबरच उद्योषणा यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली असून नियंत्रण कक्षातून नागरिकांना सुचना देणेही यामुळे शक्य होणार असल्याचेही मंत्री विखे पाटील म्हणाले.