नागपूर – कालच हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरलं. विरोधकांनी एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज चौथ्या दिवशी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची देखील कोंडी करण्यात आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आहे. दरम्यान, फडणवीसांनी एसआयटीची घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. त्यानंतरही फडणवीस यांनी हे प्रकरण एसआयटीकडे सोपवलं आहे. मात्र, आता फडणवीस यांच्या या घोषणेमुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधक देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे. अश्यातच, आता स्वतः आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरले’ असल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून बदनामी करण्याचे आणि लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.