सातारा – जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात डेंग्यू व चिकुनगुन्याचे एक हजार 28 संशयित रुग्ण सापडले होते. तपासणीअंती 312 जणांना डेंग्यू, चिकुनगुन्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णांवर आरोग्य विभागाकडून औषधोपचार करण्यात आला. जिल्ह्यात 12 ठिकाणी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होता. आजअखेर एकाही रुग्णाचा डेंग्यू अथवा चिकुनगुन्याने मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. हवामानातील बदल आणि सततच्या पावसामुळे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कीटकजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. जिल्ह्यात डेंग्यू व चिकुनगुन्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या नऊ महिन्यांत एक हजार 28 संशयित रुग्ण सापडले. या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात डेग्यू व चिकुनगुन्याचे 312 रुग्ण आढळले. या रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात 12 ठिकाणी डेंग्यू व चिकुनगुन्याच्या साथीचा प्रादुर्भाव दिसून आला. आज अखेर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तुरळक रुग्ण आणि साथीला आळा घालण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर यंत्रणा कार्यरत आहेत. डेंग्यू, चिकुनगुन्या रोखण्यासाठी घराच्या सभोवतालची डबकी, खड्डे बुजवणे, गटारे वाहती करणे, शोषखड्डे बनवणे, इमारतींवरील टाक्या, हौदांना घट्ट झाकणे बसवणे, संडासांच्या व्हॅट पाइप्सना जाळ्या बसवणे, घरातील टायर, भंगार, निकामी डबे, बाटल्या, प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणे,
घरातील कूलर, फुलदाण्या स्वच्छ आणि कोरड्या ठेवणे, घरातील आणि भोवतालचे पाण्याचे रांजण, बॅरल, हौद कापडांनी व्यवस्थित झाकून ठेवणे आणि आठवड्यातून एकदा स्वच्छ करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याबाबत ग्रामपंचायत, नगरपालिकांमार्फत नागरिकांना आवाहन करणे, गावाभोवतालच्या मोठ्या पाणीसाठ्यांमध्ये (उदा. ओढे, डबकी, तलाव, मोठे हौद) गप्पी मासे सोडणे, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
साथीचा 12 ठिकाणी प्रादुर्भाव; आरोग्य विभागाकडून उपाययोजना
जिल्हास्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा आहे. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. रुग्णांना तातडीचे उपचार व सेवा देण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी