पिंपरी – महापालिकेच्या विविध विभागात शिपाई पदावर काम करणाऱ्यांसाठी नाईक आणि हवालदार ही पदोन्नतीचे दोन्ही पदे रद्द झाल्याने शिपायांना वेतनवाढ मिळत नाही. नवीन आकृतीबंधात ही दोन्ही पदे निर्माण केली असली तरी आकृतीबंध मंजूर होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे आमचा स्वतंत्र प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी शिपायांनी केली. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार करून अतिरिक्त आयुक्तांची स्वाक्षरीसाठी पाठविला. मात्र, अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीविना हा प्रस्ताव 24 दिवसांपासून धूळखात पडून आहे. प्रस्ताव पाठविण्यास विलंब होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. या आकृतीबंधात काही पदे रद्द करून काही नवीन पदांचा समावेश केला आहे. मात्र, पूर्वी महापालिकेत शिपायांना पदोन्नतीने नाईक आणि हवालदार या पदावर जाता येत होते. त्यामुळे त्यांची वेतनवाढही होत होती. मात्र, पालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही दोन्ही पदेच काही वर्षांपूर्वी रद्द झाली. ही पदे रद्द झाल्यामुळे शिपायांची वेतननाढ होत नसून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेतील सर्व शिपायांनी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर आयुक्तांच्या सुचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी नाईक आणि हवालदार या दोन्ही पदांचा नवीन आकृतीबंधात समावेश केला आहे.
हा आकृतीबंध राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. मात्र, आकृतीबंध मंजूर होण्यास वेळ लागत असल्याने आमचा स्वतंत्र प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी सर्व शिपायांनी आयुक्त सिंह यांच्याकडे केली. त्यानुसार प्रशासनाने स्वतंत्र प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी अतिरिक्त आयुक्त-2 विजयकुमार खोराटे यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविला. अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीविना हा प्रस्ताव धूळखात पडून आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.8) अतिरिक्त आयुक्त खोराटे यांची भेट घेतली. प्रस्तावावर तातडीने सही करून शासनाकडे पाठविण्याची विनंती केली.
सर्व कर्मचारी माझ्याकडे आले होते. त्याप्रकरणी माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त