करे अल्पज्ञानी बहु ।
जसा निजनतेच्याअति खळखळाट ।।
असे पुर्णज्ञानी कमी बोलणारा।
विना नाद वाहे जशी गंगाधारा।।
समाजकारणाच्या चळवळीत अनेक प्रकारचे नेते असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्त्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संथ वाहत अवघे गाव चिंब करणारा एक नेता जर कोण असेल तर, ते खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक गावचे सरपंच जयसिंग सोपान भोगाडे होय.
शांत, संयमी, मितभाषी, प्रसंगी आक्रमक, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून जयसिंग भोगाडे यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांत नावलौकिक आहे. जनहितार्थ निर्णय, पारदर्शक कारभार, कर्तव्यदक्ष आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्य संपन्नता लाभलेले एक असामान्य नेतृत्व म्हणजे जयसिंग भोगाडे होय. अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव, जनसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्त्वाची बाब म्हणजे खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते नेते म्हणजे सरपंच जयसिंग सोपान भोगाडे होय.
खरपुडी बुद्रुक गाव एसीझेडमध्ये मोडत असून गावात शेतीच हा मुख्य उत्पन्नाचा स्रोत असून गाव पूर्णपणे बागायतदार असल्याने तसे सधनच म्हणावे लागेल. याच गावात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जास्तीत जास्त उपयोग करावा यासाठी जयसिंग भोगाडे हे प्रयत्नशील आहेत. तसेच गावात घरोघरी शौचालय असल्याने गाव संपूर्णपणे हागणदारीमुक्त आहे. गावातील जवळपास बरीच शौचालये आकर्षक पद्धतीने रंगविण्यात आली आहेत. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. या छोट्या गावात अंगणवाडी असून तिथे पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहे.
अंगणवाडीत एलईडीची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेसह संपूर्ण गावात सुंदर सुविचार लिहिण्यात आले आहेत. खरपुडी बुद्रुक ग्रामपंचायतची इमारत क्षणभर माणूस पाहातच राहतो, इतकी सुंदर बनविण्यात आली आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला गावाच्या बाहेर टाके बांधून गुरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. गावात अनेक ठिकाणी सौर दिवे सुद्धा लावण्यात आले आहेत. ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक असावा यासाठी ग्रामपंचायत, वाचनालय व गावातील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दूरदृष्टीने झपाटून काम करणारे गतिमान नेतृत्व म्हणजेच जयसिंग भोगाडे. त्यांच्यासोबत काम करताना वेगळीच ऊर्जा मिळते.
त्यांनी जेव्हापासून सरपंच संघटनेची जबाबदारी स्वीकारली आहे, त्या प्रत्येक जबाबदारीत सतत जागृत असणार नेतृत्व भोगाडे यांच्यात पाहावयास मिळाले. त्यांच्याबरोबर काम करताना अनेक अनुभव मिळतात मार्गदर्शन मिळाते. तालुक्यातील सरपंचांच्या व अनेक युवकांच्या समस्या जाणणारे नेता म्हणून त्यांचे नाव अग्रभागी आहे. कोणतेही काम हातात घेताना, सुरू करताना होणारे फायदे-तोटे, दूरगामी परिणाम यांचा विचार करून सखोल अभ्यास करून कामास सुरुवात करण्याची खास हातोटी सरपंच भोगाडे यांच्याकडे आहे. याचा अनुभव त्यांच्यासोबत कार्य करणाऱ्या प्रत्येकाने घेतला आहे.
घरात लहानपणापासूनच बैलगाडा शर्यतींची आवड असल्याने घरात कायमच बैलांची देखभाल केली जाते. लहानपणापासून हेच बाळकडू मिळाले असून मध्यतरी बैलगाडा शर्यतींना बंदी असल्याने थोडा हरमुसलो होतो; पण आणि पुन्हा भिर्र भिर्र भिर्र घाटा होत असल्याने नव्या जोमाने बैलगाडा शर्यतींचा माझा छंद सहकारी, घरची मंडळी, ग्रामस्थांच्या मदतीने जोपासला आहे.
विकासकामे
- सरपंचपदाच्या एक ते सव्वावर्षांच्या कार्यकाळात 11 कोटींची त्यांनी विकासाची गंगा त्यांनी गावात आणली आहे.
- तुकाई माता ग्राममंदिराच्या कामासाठी विविध माध्यमांतून दीड कोटी रुपयांचे मंदिर उभारण्याचे काम केले
- रस्ते बांधणीसाठी पुढाकार
- जलजीवन योजनेसाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले असून त्या माध्यमातून काम सुरू आहे.
- दशक्रिया घाटचे काम
- बाह्यवळणाच्या कामासाठी सर्व सहकाऱ्यांनी, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मदतीने सव्वादोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काम सुरू
- वाड्यावस्त्यांवर सिमेंट कॉंक्रिटीकरण
- गावाचे सुशोभिकरण
समाजकारणाचे बाळकडू घरातूनच
समाजकारण करण्याचे बाळकडू जयसिंग भोगाडे यांना हे घरातून मिळाले आहे. त्यांचे वडील सोपान भोगाडे हे विकास सोसायटीचे अध्यक्ष असतानाच जयसिंग हे त्यांच्या समवेत समाजकारण करण्यास सुरुवात केली. जयसिंग भोगाडे हे सरपंच होण्यापूर्वी त्यांनी याआधी विकास सोसायटीचे संचालक ते अध्यक्षपद असा प्रवास केला आहे. त्यानंतर त्यांनी आता मार्च 2022 पासून गावचा कारभार सरपंचपदाच्या भूमिकेतून हाकत असून त्यांच्या आतापर्यंतच्या वर्षभराच्या कार्यकाळात गावात अनेक विकासकामे सुरू असून खरपुडी बुद्रुक हे गाव स्मार्ट गाव म्हणून त्यांना नावारूपाला आणायचे असल्याने त्यादृष्टीने त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.
गावचे कुटुंबप्रमुख
जयसिंग भोगाडे यांनी गावचे सरपंचपद भूषवत असून गावाशी एक नाते तयार केले, गावचा कुटुंबप्रमुख म्हणूनच ते वावरतात. गावातील लोकांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी होतात. गावचे सरपंच असूनही पुढारपण कधीही त्यांच्या डोक्यात गेले नाही. ते कायम कार्यकर्त्याच्या भूमिकेत असतात. त्यांच्या याच गुणामुळे मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून आणून बाजार समितीवर संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.
आगामी कार्य
- गावाचा विकास
- तरुणांना गावातच रोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार
- शैक्षणिकदृष्ट्या महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडून तो मंजूर करण्याचा प्रयत्न आहे.
- गावातील अनेक धार्मिक मंदिरांचा जीर्णोद्धार करावयाचा आहे
- गावात सर्व जाती-धर्मांचे नागरिक राहात असून असाच कायम एकोपा राहावा यासाठी कायमच झटत राहणार
- गावात 24 तास घरोघरी पाणी मिळावे यासाठी योजनेचे काम सुरू आहे
- आमदार मोहिते यांनी संधी दिल्यास जिल्हा परिषद, पंचायत समितीचीही निवडणूक लढण्यास तयार