परभणी – शिंदे गटात आणखी तीन खासदार आणि पाच आमदार सामील होणार असल्याचा दावा राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटाचे समर्थक अब्दुल सत्तार यांनी केला आहे. परभणीत बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. सत्तार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सत्तार म्हणाले, शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडामुळे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले. आणखी पाच आमदार आणि तीन खासदार सामील होणार आहेत. आम्ही 40 आमदार आणखी दहा, त्यात अजून पाच आमदार येणार आहेत. तर आधी 10 खासदार मग 12 झाले आणि आता आणखी तीन खासदार येणार आहेत. तरीही लोक असली नकली बोलत आहेत. मग हे येणारे वेडे आहेत का? असा सवालही सत्तार यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सत्तार म्हणाले, हे सर्व कशामुळे झाले तर घरात बसल्यामुळे. आता ते गल्ली बोळात फिरत आहेत. आधीच फिरले असते तर ही वेळ आली नसती. तुम्ही सत्तेत असताना, मुख्यमंत्री असताना जनतेला काही दिलं नाही आता काय देणार? तुमची सत्ता येण्याचं स्वप्न दहा जन्मही पूर्ण होणार नाही, असेही सत्तार यांनी म्हंटले.