लंडन : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने इंग्लंडला त्यांच्याच जमिनीवर एकदिवसीय मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप देण्यात यश मिळवले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना बऱ्याच कारणांनी चर्चेत राहीला. कारण याच सामन्यात भारतीय आनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्ण विराम दिला. त्याचबरोबर दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर इंग्लंडची शार्लोट डीन मंकडिंग पध्दतीने धावबाद झाली. यानंतर मात्र सोशल मिडियावर या घटनेवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन याने दीप्ती शर्माचे कौतुक देखील केले आहे.
भारतीय महिला संघाने इंग्लंड विरुध्दचा शेवटचा एकदिवसीय सामना 16 धावांनी जिंकला. झुलन गोस्वामीचा हा शेवटचा सामना असल्याने तिला संघाने विजयी निरोप दिला. या सामन्यात भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही . संपूर्ण संघ अवघ्या 169 धावांवर आटोपला. मात्र भारताने गोलंदाजीत कमाल दाखवली आणि इंग्लंडचा डाव 153 धावांत गुंडाळला. सामन्यातील दमदार गोलंदाजीसाठी भारताच्या रेणुका सिंगला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ तर कर्णधार हरमनप्रीत कौरला (221 धावा) ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मात्र सध्या सोशल मिडियावर भारताच्या या सामना विजयापेक्षा दीप्ती शर्माचीच जास्त चर्चा सुरू आहे. सामन्यात इंग्लंड संघाला 16 धावांची गरज असताना इंग्लिश फलंदाज शार्लोट डीनला दीप्तीने मंकडिंग पध्दतीने धावबाद केले आणि भारताने सामना जिंकला. मात्र यानंतर सोशल मिडियावर दीप्ती शर्माला काही नेटकरी ट्रोल करत आहेत, तर काहींनी तीची बाजू देखील घेतली आहे. तसेच या घटनेनंतर पुन्हा एकदा मंकडिंगची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनही सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला.
Why the hell are you trending Ashwin? Tonight is about another bowling hero @Deepti_Sharma06 🤩👏
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) September 24, 2022
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने याचे समर्थन केले आहे. त्याने याबाबत एक ट्विट देखील केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, “‘मी का ट्रेंड होतोय, आजचा दिवस तर दुसर्या स्टार गोलंदाजाचा आहे. आजची बॉलिंग हिरो दिप्ती शर्मा आहे’ असे म्हणत त्याने दीप्ती शर्माला ट्विटमध्ये टॅग केले आहे.
अश्विनने आयपीएलमध्ये जोस बटलरला केले होते मंकडिंग
आयपीएल स्पर्धेत आर अश्विनने पंजाब संघाकडून खेळताना राजस्थान संघाकडून खेळणाऱ्या जोस बटलर याला मंकडिंग पध्दतीने धावबाद केले होते. त्यावेळी त्याला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. यावेळी प्रमाणे त्यावेळी देखील पंचांनी बटलरला बाद ठरवले होते.
असा घटनांना खेळ भावनेतून चुकीच मानलं जात परंतु आता आयसीसीने याचा नवीन नियमात समावेश केला आहे. त्यामुळे आता मंकडिंग बाद करणे हे जरी खेळ भावनेतून चुकीचे असले तरी नियमानुसार फलंदाजाला बादच ठरवले जाते.