यवतमाळ – यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे वर्चस्व राहिलेला विदर्भातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर आता दोन्ही गटांनी याठिकाणची लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. महाविकास आघाडीचा विचार करता ठाकरे गटाने या जागेवरची दावेदारी सिद्ध करत जागा मिळवली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अद्याप या जागेचा तिढा सुटला नसल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी विद्यमान खासदार असल्या तरी शिंदेंच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेल नाही. भावना गवळी यांना पक्षातीलच संजय राठोड यांच्याबरोबर या जागेसाठी स्पर्धा करावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांत याबाबत दोघांची वक्तव्य समोर आली आहेत. त्याचबरोबर युतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागेसाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे यवतमाळ-वाशिम मतदारसंघ राखण्यात शिंदेंना यश येते की, अजित पवार गटाला ही जागा देऊन भाजप महायुतीतही त्यांच्या धक्कातंत्राचा प्रभाव दाखवते, हे जागांचा तिढा सुटल्यानंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं स्वगृही परतलेल्या माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाल्यानंतर बराच काळ ते अपक्ष आमदार राहिले. त्यांनी 10 वर्ष दिग्रस आणि आर्णी मतदारसंघाचे विधानसभेमध्ये नेतृत्व केले. अपक्ष आमदार असतानाही मंत्रिपद मिळवण्याची किमया त्यांनी साधली होती. 2002 ते 2004 या काळात ते राज्यमंत्री होते.
संजय देशमुख आणि संजय राठोड यांची राजकीय कारकिर्द बऱ्याच अंशी समकालीन राहिली आहे. जिल्ह्यामध्ये या दोन्ही नेत्यांकडं एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणूनच पाहिले जाते. 2019 मध्ये संजय देशमुख यांचा संजय राठोड यांनी पराभव केला होता.