पाटणा – बिहारमध्ये वाट्याला आलेल्या लोकसभेच्या सर्व १७ जागांवरील उमेदवार भाजपने जाहीर केले. त्यामुळे भाजपने ३ विद्यमान खासदारांचा पत्ता कट केल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये केंद्रीय मंत्री अश्वनीकुमार चौबे यांचाही समावेश आहे. बिहारमध्ये भाजप, जेडीयू आणि इतर पक्षांचा समावेश असणाऱ्या आघाडीची (एनडीए) सत्ता आहे. (Bihar Lok Sabha Election 2024)
एनडीएच्या जागावाटपानुसार त्या राज्यातील लोकसभेच्या एकूण ४० पैकी सर्वांधिक जागा भाजप लढवणार आहे. वाट्याला आलेल्या सर्व जागांवरील उमेदवार त्या पक्षाने रविवारी जाहीर केले. त्यानुसार, १४ विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. मात्र, चौबे, छेदी पासवान आणि अजयकुमार निषाद या खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली. भाजपच्या बिहारमधील उमेदवारांमध्ये एकाही महिलेचा समावेश नाही.
भाजपचा प्रमुख मित्रपक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूनेही रविवारी सर्व १६ उमेदवार जाहीर केले. एनडीएपुढे यावेळी विरोधी बाकांवरील महाआघाडीचे आव्हान असेल. महाआघाडीत राजद, कॉंग्रेस, डाव्या पक्षांचा समावेश आहे. उत्तरप्रदेश (८०), महाराष्ट्र (४८), आणि पश्चिम बंगालनंतर (४२) लोकसभा जागांच्या संख्येबाबत बिहारचा क्रमांक लागतो.