राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 137 व्या तुकडीला पदवी प्रदान
पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 137 व्या तुकडीतील 284 जणांना पदवी प्रदान करण्यात आली. 3 वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये सर्वोत्तम गुण मिळविणाऱ्या कॅडेट्सना चषक प्रदान करण्यात आले.
विज्ञान शाखेच्या 42, संगणक विज्ञान शाखेच्या 85, कला शाखेच्या 84 आणि बी.टेक शाखेच्या 73 कॅडेट्सचा समावेश आहे. यामध्ये मित्र राष्ट्रातील 13 जणांचा समावेश आहे. प्रबोधिनीच्या पदवी प्रदान सोहळ्यात विज्ञान शाखेतून अनुराग पांडे याला “चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी’ आणि “कमांडन्ट सिल्वर मेडल’ने, संगणक विज्ञान शाखेतून माझी गिरीधर याला “चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी’ आणि “कमांडन्ट सिल्वर मेडल’ने, कला शाखेतून सुमंत कुमार याला “चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफी’ आणि “कमांडन्ट सिल्वर मेडल’ने गौरविले. तर बी.टेक शाखेत सहाव्या सेमिस्टरपर्यंत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या निशांत विश्वकर्मा या विद्यार्थ्याला “ऍडमीरल ओ. एस. डॉसन ट्रॉफी’ आणि “कमांडन्ट सिल्वर मेडल’ने सन्मानित केले.
मी मूळचा विशाखापट्टणम येथील आहे. प्रबोधिनीमध्ये 3 वर्षांचे खडतर प्रशिक्षण आम्ही पूर्ण केले आहे. या काळात शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ यामुळे नेतृत्व गुणाचा विकास करू शकलो. भविष्यात मला लष्कराच्या गोरखा रायफल रेजिमेंटमध्ये दाखल व्हायचे आहे. प्रबोधिनीचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो.
– माझी गिरीधर
माझे वडील लष्करात नायब सुभेदार म्हणून कार्यरत आहे. मूळचा बिहारमधील समस्तीपूर येथील आहे. चांगले प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी झारखंड येथील सैनिकी शाळेत दाखल केले होते. मुलाने लष्करात अधिकारी व्हावे अशी इच्छा वडिलांची होती. वडिलांचे स्वप्न आज पूर्ण झाल्याने फार आनंद वाटत आहे.
– सुमंत कुमार
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून एनडीएमध्ये प्रवेश घेतला आहे. माझे आजोबा बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये होते. वडिलांनादेखील लष्करात भरती व्हायचे होते. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. सध्या ते उत्तर प्रदेश पोलीस खात्यात आहेत. माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो, याचा अभिमान आहे. रणगाड्यांबाबत विशेष आकर्षण असल्याने, मला आर्मड कोअरमध्ये जायचे आहे.
– अनुराग पांडे
मी मूळचा मध्य प्रदेश येथील असून डेहराडून येथे सैनिकी शाळेत बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यामुळे शालेय वयापासूनच लष्करामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित झालो. एनडीएच्या परीक्षेची तयारी माझी शाळेतच झाली. भविष्यात नौदलात नेव्हीगेटींग ऑफिसर व्हायचे आहे.
– निशांत विश्वकर्मा