पुणे – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील 3 वर्षांचे प्रशिक्षण अतिशय खडतर असते. प्रशिक्षण कालावधीत कॅडेट शारीरिक दुखापत होऊन किंवा अन्य कारणांनी प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. यामुळे लष्करात अधिकारी होण्याच्या स्वप्नाबरोबरच त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी त्यांना त्यांचे शिक्षण नॉर्थ इस्टर्न हिल युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण करता येणार आहे. येत्या काही दिवसांतच संरक्षण मंत्रालय आणि विद्यापीठामध्ये सामंजस्य करार होणार आहे, अशी माहिती नॉर्थ इस्टर्न हिल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. एस. श्रीवास्तव यांनी दिली. दीक्षांत समारोहात ते बोलत होते.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 137 व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा हबीबुल्लाह सभागृहात शुक्रवारी झाला. यावेळी प्रबोधिनीचे कमांडन्ट एअर मार्शल आय. पी. विपीन, डेप्युटी कमांडन्ट रिअर ऍडमिरल एस.के.ग्रेवाल, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला यांसह विभागप्रमुख आणि प्रशिक्षक उपस्थित होते.
श्रीवास्तव म्हणाले, पहिल्या टप्प्यात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाबरोबर याबाबत चर्चा देखील सुरू झाली आहे. भविष्यातही याबाबत बैठका घेतल्या जाणार आहेत. लवकरच याबाबत सामंजस्य करार होणार आहे, असे त्यांनी नमूद केले. देशाला सर्वगुणसंपन्न अशा लष्करी अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. हे अधिकारी युद्धभूमित हुशारीने युद्ध लढू शकतील, असे यावेळी विपीन म्हणाले. देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी भविष्यातील अधिकारी म्हणून कार्य कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डेप्युटी कमांडन्ट रिअर ऍडमिरल एस.के.ग्रेवाल यांनी आभार मानले. लेफ्टनंट कमांडर अर्चना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.