लॉकडाऊन काळात पोलिसांची कारवाई : 35 हजारांवर वाहने जप्त
36,75,000 रुपये दंड वसूल
पुणे – लॉकडाऊन काळात बेशिस्त वागणाऱ्या पुणेकरांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. लॉकडाऊन-1 पासून आतापर्यंत 26 हजार 526 जणांवर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 36 लाख 75 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची 35 हजार वाहनेदेखील जप्त करण्यात आली.
लॉकडाऊनमध्ये नियमांचे पालन व्हावे, यासाठी ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करत कारवाई सुरू केली. यात विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. नागरिक ऐकत नसल्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली. मात्र, लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर ही कारवाई कमी केली होती. पण, ती आता सुरू करण्यात आली आहे.