जुन्नर (वार्ताहर) – जुन्नर शहरात गेल्या 24 तासांत एक नवीन रुग्ण आढळला असून, तालुक्यात केवळ 2 नवीन करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या वाढून 37 झाली आहे. त्यांपैकी 31 जण ऍक्टिव्ह आहेत तर 4 जण बरे झाले आहेत आणि दोघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी तालुक्यातील आळे येथे दोन रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 286 झाली आहे. यांपैकी 153 जण ऍक्टिव्ह आहेत तर 123 जण बरे झाले आहेत. दरम्यान रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून जुन्नरसहित तालुक्यातील बळींची संख्या 7 झाली आहे.
दरम्यान 11 तारखेला सुरू झालेला लॉकडाऊन सोमवारी (दि. 20) संपल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठराविक वेळेमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंचे व्यवहार करण्यास जुन्नर शहरात परवानगी दिली आहे. ह्या लॉकडाऊनच्या शेवटी रुग्णसंख्या घटली असून यापुढील काळातही नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन केल्यास करोना थोपविणे शक्य असल्याचे जुन्नर नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी सांगितले. करोना लॉकडाऊनमुळे शहरातील प्रमुख बाजारपेठेत सोमवारी शुकशुकाट होता.