भोर तालुक्यात शरद भोजन योजनेतील अन्नधान्य वाटप सुरू
भोर- पुणे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या शरद भोजन योजनेतील पात्र लाभार्थींना 1 मे या महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून भोर तालुका पंचायत समितीने अन्नधान्य वाटपाचा शुभारंभ केला असल्याची माहिती भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
पहिल्याच दिवशी तालुक्यातील 2404 पात्र लाभार्थींना प्रत्येकी 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू असे एकूण 5 किलो धान्य आवघ्या 13 रुपयांत वाटप करण्यात आले असल्याचे सांगून तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींमधील एकूण 8524 लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. भोर नगरपालिका कार्यक्षेत्रातील पात्र लाभार्थींनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे गट विकास अधिकारी तनपुरे यांनी यावेळी सांगीतले.
पहिल्या टप्प्यात 12 टन धान्य उपलब्ध झाले असून, आणखी एवढेच धान्य उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींपर्यंत ग्रामसेवकांच्या माध्यमातून सर्व अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठल आवाळे, विस्तार अधिकारी रामेश्वर राठोड, राजेंद्र चांदगुडे, रंगनाथ हुजरे यांच्या सह अनेक ग्रामपंचायतींचे ग्राम सेवक उपस्थित होते. उपलब्ध धान्याचा साठा भोर येथील मुकबधिर विद्यालयाच्या गोडाऊनमध्ये जमा करण्यात आला आहे.