पिंपरी – पालखी मार्गावरील सर्व रस्ते सुव्यवस्थित व खड्डेमुक्त करण्यात आले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आलेली आहेत. पालखी मुक्काम, विसावा, स्वागत कक्ष आणि पालखी मार्गावर 200 सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
आयुक्त म्हणाले, वारीचे त्यांचे थेट प्रक्षेपण व रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी वॉकी टॉकी संच, वायरलेस संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी आणि पालखी मार्गावर फिरते कंट्रोलरूम उभारण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने दोन ड्रोनची व्यवस्था करण्यात आहे, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांचे सहकार्य मिळणार आहे.
पालखी सोहळ्याकरीता मुख्य समन्वयक, ग्रुप कमांडर अशा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पालखी सोहळ्याचे नियोजनाबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी पालखी सोहळ्यात स्वच्छाग्रह चित्ररथ असणार आहे. यावेळी स्वच्छतेबाबत विविध चित्रफीत व पथनाट्य याद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.