भाजपचे पाचही उमेदवार विजयी कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत
मुंबई – राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन यशस्वी ठरला असून भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत 10व्या जागेवर भाजपचे प्रसाद लाड यांनी बाजी मारल्याने अनपेक्षितरित्या कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. कॉंग्रेसचे भाई जगताप यांचा विजय झाला आहे. हंडोरे हे कॉंग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. त्यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीतील पहिल्या फेरीत भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी चार-चार उमेदवार विजयी झाले. पहिल्या फेरीमध्ये रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतासाठी 25.73चा कोटा ठरवण्यात आला होता. यामध्ये भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण
दरेकर यांचा, तर महाविकास आघाडीच्या रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, आमशा पाडवी आणि सचिन अहिर यांनी विजय मिळविला. दुसऱ्या फेरीत नवव्या आणि दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड, कॉंग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यामध्ये चुरस होती. यात प्रसाद लाड आणि भाई जगताप यांनी विजय मिळविल्याने चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्कारावा लागला.
मतमोजणीवेळी दोन मते बाद :विधानपरिषद निवडणूक मतमोजणीवेळी आक्षेप घेतल्याने दोन मते बाद झाली आहेत. भाजपच्या उमेदवार उमा खापरे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील मतपत्रिकेवर खाडाखोड आढळल्याने आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे ही दोन मते बाजूला ठेवण्यात आली. दोन मते बाद झाल्याने 283 मते वैध ठरली. यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा 25.71 वर आला. विधानपरिषद निवडणुकीत 285 आमदारांनी मतदान केले.
कॉंग्रेसचा आक्षेप फेटाळला :विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसने भाजप आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. टिळक आणि जगताप यांनी आपली मतपत्रिका स्वत: मतपेटीत न टाकता सहकाऱ्यांची मदत घेतली. हा गोपनीय मतदानाचा भंग असल्याचा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे.
महाविकास आघाडी चिंतेत
राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत भाजपने चमत्कार घडवला. त्यामुळे त्या पक्षाचा उत्साह दुणावणार आहे. त्याउलट, सलग दोन निवडणुकांत हादरा बसल्याने सत्तारूढ महाविकास आघाडीच्या गोटातील चिंता वाढणार आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्याचेही उघड झाले. ती बाब आघाडीचे आणखीच टेन्शन वाढवणारी आहे. आघाडीकडे आता काठावरचे बहुमत राहिल्याचेही ताज्या निवडणुकीतून पुढे आले आहे.
विजयी उमेदवार
शिवसेना : आमशा पाडवी, सचिन अहीर
राष्ट्रवादी कॉंग्रेस : रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे
भाजप : उमा खापरे, राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड
कॉंग्रेस : भाई जगताप