नेवासा – जगदगुरू श्री. संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी ३७५ व्या वैकुंठगमन सोहळयानिमित्त नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये नियोजन बैठक पार पडली. सोहळयाचे प्रमुख मार्गदर्शक महंत गुरुवर्य श्री. उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संत तुकाराम महाराजांच्या बीजेच्या निमित्ताने यंदा संगीत श्रीमद भागवत कथेसह कीर्तन महोत्सवाचे आयोजन बुधवार दि. २० मार्च ते २७ मार्च या कालावधीत करण्यात आले, अशी माहिती महंत उध्दवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना दिली.
सदर बैठकीच्या प्रसंगी महंत श्री उध्दवजी महाराज मंडलिक यांनी आलेल्या सेवेकरी भाविकांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. संत तुकाराम महाराजांच्या बिजोत्सवाच्या निमित्ताने मंदिर प्रांगणात पहाटे काकड आरती, सकाळी ७ ते ११.३० गाथा पारायण, चहा नाष्टा, दुपारच्या सत्रातील भोजन होणार आहे. तर यंदा दुपारी ३ ते ५.३० यावेळेत संत तुकाराम महाराज मंदिराचे विश्वस्त भागवत कथाकार हभप अंकुश महाराज जगताप यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीत श्रीमद भागवत कथा होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. रात्री ८ ते १० यावेळेत होणारे कीर्तन तसेच दररोजचे अन्नदान या धार्मिक कार्यक्रमाची व नियोजनाची रूपरेषा देखील ठरविण्यात आली.
यावेळी बोलतांना महंत उध्दवजी महाराज मंडलिक म्हणाले की, “दरवर्षी येणाऱ्या तुकाराम महाराजांच्या बीजेच्या निमित्ताने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येकाच्या सूचनेनुसार अखंड हरिनाम सप्ताहात होणारे संतपूजन, रात्रीचे अन्नदान याबाबत भक्त मंडळातील दात्यांनी योगदान दिले. त्यामुळे योग्य नियोजन रूपरेषेच्या नुसार करण्यात आले. माऊलींच्या नगरीत होणारा हा बीजेचा उत्सव या ही वर्षी वैभवात होण्यासाठी सर्वांनी मिळून योगदान देऊ या. तसेच या सोहळयाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळा वैभवशाली पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रयत्न करावा,” असे आवाहन यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या नियोजन बैठक प्रसंगी विश्वस्त इंजिनियर सुनीलराव वाघ सेवेकरी पी. आर.जाधव, अॅड . काकासाहेब गायके यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस ज्येष्ठ मार्गदर्शक रामभाऊ जगताप, शंकरराव लोखंडे, अँड. डॉ.लक्ष्मणराव खंडाळे, सतीश मुळे, प्रा.रामनाथ नन्नवरे, रखमाजी नाचन, रामराव बोरुडे, ज्ञानदेव शिंदे, एकनाथ डोहोळे, रावसाहेब पेचे, नंदूभाऊ गायके, बबनराव काळे, बी के पवार, शशिकांत नळकांडे योगेश रासने, जालिंदर गवळी, जयदीप जामदार, शिवाजी साळुंके, दिगंबर लष्करे, रामदास बेहळे, संतोष लगड उपस्थित होते.