नवी दिल्ली – भारतामध्ये कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स उभारण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सुधारित धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे’ जारी केली आहेत. चेन्नई येथे अण्णा विद्यापीठामध्ये आज सुरू झालेल्या कम्युनिटी रेडिओ संमेलनाच्या उद्घाटन समारंभात मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली.
कम्युनिटी रेडिओ केंद्रांवरून स्थानिक बोली आणि प्रादेशिक भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित केले जातात, त्यामुळे बोली भाषांना एक चांगले व्यासपीठ मिळते. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक संदर्भ, विशिष्ट मुद्दे उपस्थित केले जातात आणि स्थानिक वाक्यप्रचार, म्हणी यांचा वापर संभाषणात केला जातो.
ही स्टेशन लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचा एक उत्तम मार्ग आहे कारण या रेडिओ केंद्रांमार्फत स्थानिक पातळीवर समाजासाठी उपयुक्त कार्यक्रम प्रसारित करतात. समाजापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ केंद्राइतके तुलनेने स्वस्त माध्यम दुसरे असू शकत नाही, असे ठाकूर म्हणाले.
भारतातील पहिल्या कम्युनिटी रेडिओचे उद्घाटन २००४ मध्ये अण्णा विद्यापीठ परिसरात झाले होते. सध्या, भारतात ४८१ कम्युनिटी रेडिओ केंद्र आहेत आणि गेल्या दोन वर्षांत १३३ हून अधिक कम्युनिटी रेडिओ केंद्र कार्यरत झाली आहेत.