1 मे : साताऱ्यात असतो “गुलमोहर डे’

कला-संस्कृतीच्या परंपरेचे यंदाही ऑनलाईन सादरीकरण

– सौ. हर्षल राजेशिर्के, सातारा

सातारा शहरामध्ये गेली दोन दशके “गुलमोहर डे’ या नावाने प्रतिवर्षी कला, संस्कृती आणि पर्यावरणविषयक चळवळ राबवली जाते. सर्व वयोगटाच्या संवेदनशील कलाकारांचे विविध आविष्कार, चित्रं, कविता, ललित लेखन, छायाचित्रण यासह पर्यावरणाचे भान अशी ही मोहिम सर्वत्र लोकप्रिय आहे. या मोहिमेतील एक संवेदनशील चित्रकर्ती हर्षल राजेशिर्के यांनी घेतलेला एक मनोज्ञ आढावा…

शिशिरऋतुच्या पानगळीच्या पाऊलखुणा लेवून उभी असलेली वृक्षराजी एकदम कोवळ्या, लुसलुशीत लाल केशरी पालवीने जेव्हा बहरु लागते तेव्हा जाणवतं “ऋतुराज कुसुमाकर’ म्हणजेच वसंतऋतूचं आगमन होत आहे. सृष्टीचं अवघं रुपच झरझर बदलू लागतं. चैतन्याच्या सरी वृक्षवेलींवर असे काही धुमारे चितारतात आणि मनोहारी रंगांची उधळण करतात की भवतालाला आपसुकच एक उन्मेषी रंग प्राप्त होतो. पक्ष्यांच्या मंजुळ स्वरांनी, मोहराच्या सुवासाने आणि फुलांच्या सुगंधाने साऱ्या आसमंतातच एक मधुर गोडवा निर्माण होतो.

निसर्ग मुक्तपणे बहरतो तो याच काळात. पळस, पांगारा, जारुल, करंज, काटेसावर, वड,अंजनी, चाफा ,बहावा, नीलमोहर, सोनमोहर अशी विविध झाडे आपल्या पुष्पसंभाराने वसंतऋतूचं चित्र नयनरम्य बनवतात आणि त्याचबरोबर हा फुलांचा बहर म्हणजे पक्षी, किटक यांच्यासाठी खास उन्हाळ्याकरिता सष्टीने निर्मिलेले मधुघट असतात. जुन्या विचारांची पानगळ निश्‍चितच नव्या सकारात्मक पालवीला जन्म देते अन्‌ हा सारा प्रवास म्हणजेच खरं जीवन आहे.

वसंताच्या ह्या सगळ्या धामधुमीत तो मात्र अजून शांतच उभा असतो; कारण त्याचा जन्मच जणू पेटून उठण्यासाठी झाला आहे. बरोबर ओळखलंत तुम्ही- गुलमोहरच! ग्रीष्म तापायला लागला की, हा असा काही फुलतो की जणू सुरु होतं ह्याचं ध्यासपर्व. फुलायचं तर आहेच पण साधंसुधं नाही, तर पेटल्यासारखं! देहाची पाकळी पाकळी करुन रसरसून फुलायचं अन्‌ रक्तवर्णी सुमनदलांचं अर्घ्य द्यायचं तळपत्या भास्कराला; अन्‌ जिच्या कुशीत रुजलोय त्या धरित्रीला. अवघ्या भवतालाच्या भाळी असा लालभडक टिळा लावायचा की साऱ्या आसमंतानेच दखल घ्यावी, याच्या विजिगिषेची आणि ग्रीष्माच्या झळांनी कोमेजलेल्या सृष्टीला आभा प्राप्त व्हावी चैतन्याची! त्याच्या अशा फुलण्यानं आता मात्र त्याची दखल घ्यावीच लागते. कुठेही येताजाता नजर वळतेच आपोआप त्याच्याकडे अन्‌ अलगद झिरपत रहातात तनी – मनी त्याच्या बहरण्याची , मोहरण्याची विविध रुपं.खरंतर थेट आत्म्यालाच साद घालते त्याची जिद्दीने फुलण्याची आस आणि त्याचा राजस साज.

असंच काहीसं घडलं 20 वर्षांपूर्वी साताऱ्यामधे! सागर गायकवाड आणि परशुराम तारु या दोन चित्रकार मित्रांनी गुलमोहराच्या सादेला प्रतिसाद दिला अन्‌ ठरवलं त्याला चित्रबद्ध करायचं आणि मग सुरु झाला एक सिलसिला एका अनोख्या नात्याचा. वसंत आणि ग्रीष्मात बहरणाऱ्या वृक्षराजीच्या आनंदवारीचे वारकरी होण्याचा. त्यामुळेच सारी धरा जेव्हा बहरते लेवून घमघमणाऱ्या फुलांचा मोहर, साऱ्यांनाच वेध लागतात “गुलमोहर डे’ चे कारण इथे असतो ललितकलांचा जागर.

गुलमोहर मग दरवर्षीच साद घालू लागला या चित्रकार मंडळींना आणि 1 मे सुट्टीचा दिवस म्हणून प्रातःकालीन गुलमोहराचा लाल-केशरी तजेला कुंचल्याच्या सहाय्याने कागदावर उतरवायला ही मंडळी जमू लागली. चित्रकार प्रा. विजयकुमार धुमाळ, संदीप शिंदे असे चित्रकारही त्यात सामील झाले आणि मग जणू प्रथाच पडली की, 1 मे यादिवशी सकाळी जमून हे निसर्गाचे विभ्रम रंगबध्द करायचे.

पोवई नाका ते पोलीस परेड ग्राउंड रस्त्यावर आजही गुलमोहोराची असंख्य झाडे लाल तांबडे तुरे उडवत दिमाखात उभी असतात. या गुलमोहर रोडवर तेव्हा आकाराला आला हा आत्ताचा गुलमोहर डे! सकाळच्या या छोटेखानी मैफिलीची सांगता मग संध्याकाळच्या सत्रामध्ये मराठा आर्ट गॅलरीमध्ये होऊ लागली. कधी त्या कार्यक्रमाला शास्त्रीय नृत्याचा साज असे; तर कधी गायनाची साथ असे. प्रख्यात गायक जयंत केजकर यांची पहिली मैफिल रंगली याच गुलमोहोराच्या तरुतळी सुप्रसिद्ध नृत्यांगना वैशाली राजे घाटगे, अमृता मेहेंदळे यांच्या पदन्यासातून गुलमोहर रंगोत्सवाचे नुपूर रसिकांच्या मनात निनादत ठेवले.

श्रीधर साळुंखे, प्रमोद कोपर्डे, मधुसूदन पत्की, श्रीनिवास वारुंजीकर यांच्या काव्यात्म विचारांनी एक वेगळाच रंग अनुभवला. या मैफिलीने गेल्या 20 वर्षांच्या काळामध्ये विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी या सोहळ्यास हजेरी लावली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार प्रमोद कुर्लेकर, सचिन खरात ज्येष्ठ कलासमीक्षक श्रीराम खाडिलकर, वाईचे चित्रकार दाम्पत्य स्वाती आणि सुनिल काळे, कोल्हापूरचे अजय दळवी यांच्यासह अनेक चित्रकारांनी या सोहळ्यामध्ये आपल्या सादरीकरणातून संवादातून उलगडलं आहे हे सृष्टीचं काव्य !

कवी ग्रेस, मंगेश पाडगावकर यांच्यासारख्या दिग्गजांनीही व्यक्त केली होती मनीषा, या उत्सवात सहभागी होण्याची! गुलमोहर हे प्रातिनिधिक नाव आहे, या उत्सवाचं खरं तर ही आहे रसिकांची सलामी, या साऱ्याच वृक्षराजीला, जी बहरते वसंत आणि ग्रीष्मामध्ये!

थोडक्‍यात काय तर
गुलमोहर रंगोत्सव म्हणजे
स्पंदनांची गाज
संवेदनांना जाग
शब्दांन होण्याचा ध्यास
आणि चैतन्याचा न्यास.
प्रत्येक संवेदनशील मनाला निसर्गामध्ये रमणाऱ्या जीवाला ही आहे साद. इथे यावं आणि कोणी रंगात कोणी शब्दात रमावं तर कोणी निवांत बसावं या गुलमोहराच्या खुशीत आपल्याच मनाचं पुस्तक वाचत किंवा शांतपणे बसावं लाल-केशरी फुलांची पखरण अंगावर झेलत.

सर्वांच्या जिवाला शांतवणारे हे वृक्ष बहरतात ते ऐन ग्रीष्मात; सारा भवताल आल्हाददायक वाटावा म्हणून आणि अशा साऱ्याच वृक्षांप्रति आपल्या कलेच्या माध्यमातून आणि म्हणूनच इथे कोणी अध्यक्ष नाही की कुठली संस्था नाही फक्त आहे रसिकांचा सहभाग तिघांचे योगदान सोहळा रंगत जातो आणि विविध कलाविष्कार यांनी काव्यवाचन ललित लेख अभिवचन मांडणी शिल्प कॅलिग्राफी फोटोंचे आणि चित्रांचे प्रदर्शन चित्रकारांचे सादरीकरण प्रदेशनिष्ठ झाडांचे वाटप वृक्षारोपण आणि संवर्धन निसर्गाचा जराही समतोल ढळू न देता चालू असलेले कार्यक्रम आणि लहान पोरांचा उस्फुर्त सहभाग यामुळे हा सोहळा जणू साताऱ्याची सांस्कृतिक चळवळ बनला आहे गुलमोहराची गिरक्‍या घेत खाली येणारी फुलं आपल्या ओंजळीत टाकतात एक आनंदाचा ठेवा यानिमित्त तोच जपूया मनामध्ये निरंतर…
– सौ. हर्षल राजेशिर्के, सातारा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.